गोमंतक विद्या भारती तर्फे २१ एप्रिल रोजी मडगाव येथे शिशुशिक्षण शिक्षिकां व सहाय्यिकांसाठी कार्यशाळा संपन्न.


अखिल भारतीय विद्या भारती शिक्षा संस्थानशी संलग्नित असलेली गोव्यातील एकमेव संस्था 'गोमंतक विद्या भारती' तर्फे मडगावच्या महिला नूतन विद्यालयात दक्षिण गोव्यातील शिशुवाटिका शिक्षिकांसाठी (दिदींसाठी) एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाथ लाभला. यात दक्षिण गोव्यातील २५ शिशुवाटिकांमधून एकूण ९७ शिक्षिकांनी सहभाग घेतला. शैक्षणिक वर्ष २०२२ - २३ वर्षापासून सुरू होणाऱ्या “नवीन शिक्षण प्रणालीस अनुसरून नवीन शिक्षण प्रणाली आणि शिशुवाटिका शिक्षण यांचा समन्वय व तयारी” म्हणून या कार्यशाळेत शिशुवाटिका शिक्षिकांना विविध विषयांवर उद्बोधन करण्यात आले. दिनांक २१ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ९ वाजल्यापासून संध्याकाळी ५ पर्यंत या कार्यशाळेत विविध विषयांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले. या प्रशिक्षणवर्गाचा प्रारंभ दीप प्रज्ज्वलनाने व सरस्वती वंदना तथा विद्याभारतीची प्रार्थनांच्या सामूहिक पठणाने झाले.


कार्यशाळेचे उदघाटन नावेलीचे नवनिर्वाचित आमदार मा. श्री. उल्हासजी तुयेंकर यांच्या हस्ते करण्यात आले. गोमंतक विद्याभारतीच्या योजिलेल्या सर्व कार्यक्रमांचे त्यांनी मनःपूर्वक कौतुक तर केले तसेच सर्व कार्यक्रमात स्वतःकडून अपेक्षित असलेली मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले. छ. शिवाजी विद्यापीठ (कोल्हापूर) येथील शिक्षणतज्ञ प्रा. डॉ. कृष्णाजी पाटील यांचे बीज भाषण झाले. “नवीन शैक्षणिक धोरण आणि शिशु शिक्षण” या विषयावर त्यांनी उत्कृष्ट मार्गदर्शन करून प्रशिक्षणार्थींच्या मनात नवीन शैक्षणिक धोरणासंदर्भात सकारात्मक ऊर्जा व दृष्टिकोण निर्माण केला. या प्रशिक्षण वर्गात प्रा. अनीलजी सामंत यांचे “शिशुशिक्षण आणि संगीत”, सुश्री वृंदाताई मोये यांचे “शिशुशिक्षण आणि भाषा” तसेच “शिशुशिक्षण आणि विज्ञान प्रयोग” या विषयावर सुश्री ज्योतीताई कोरगावकर यांचे सत्र अशी विविध सत्रे या कार्यशाळेत झाली. समारोप सत्राच्या पूर्वी प्रश्नोत्तरांचे सत्रही झाले.

ह्या प्रशिक्षण कार्यशाळेचा समारोप शिक्षणतज्ञ व गोमंतक विद्या भारतीचे राज्य (प्रांत) कार्यकारिणी सदस्य प्रा. अनीलजी सामंत ह्यांनी केला. गोमंतक विद्याभारतीचे अध्यक्ष सुदिन नायक यांनी कार्यशाळेचे प्रास्ताविक तर पाहुण्यांचा परिचय व सुत्रसंचालनाची धुरा कार्यवाह प्रसाद रांगणेकर यांनी सांभाळली. याप्रसंगी कार्यकारणी सदस्य श्री शिरीषकुमार आमशेकर यांनी गोमंतक विद्याभारतीतर्फे येत्या काळात अनेक कार्यशाळा तसेच उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे आपल्या मनोगत सांगितले. वर्गाचा समाप्ती सामूहिक शांति मंत्रपठणाने झाली. पहिल्याच कार्यशाळेला लाभलेला उत्स्फूर्त प्रतिसाद बघता गोमंतक विद्याभारती ही गोव्याचा शैक्षणिक क्षेत्रात एक सकारात्मक ऊर्जा भरून एक क्रांती व इतिहास घडवेल यान तीळमात्रही शंका नसल्याचे अध्यक्ष श्री सुदिन नाईक यांनी या पत्रकारांना सांगितले.

Gallery